संचालक (वाणिज्य)
महावितरण कंपनीच्या संचालक (वाणिज्य) पदाचा डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. या आधी ते मुख्य अभियंता (देयके व महसूल) म्हणून महावितरणमध्ये कार्यरत होते.
वीज वितरणाच्या क्षेत्रातील तज्ञ व विश्लेषक म्हणून ओळख असणारे डॉ. केळे हे मूळचे उस्मानाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. तत्कालीन महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळामध्ये ते कनिष्ठ अभियंता म्हणून १९९१ मध्ये रुजू झाले. त्यानंतर विविध वरिष्ठ पदांवर त्यांनी चिपळूण, गुहागर, खेड, भिवंडी, मुंबई, पेण, नागपूर आदी ठिकाणी काम केले आहे. तर अकोला परिमंडलासह महावितरणच्या मुख्यालयात वितरण व वाणिज्यिक, तांत्रिक आस्थापना, देयके व महसूल या विभागांचे मुख्य अभियंता म्हणून काम केले आहे. तसेच भिवंडी येथे टोरंट पॉवरमध्ये ते कार्यरत होते. विशेष म्हणजे मध्यप्रदेश पश्चिम क्षेत्र विद्यूत वितरण कंपनीमध्ये संचालक (तांत्रिक) तसेच वीजपुरवठ्यासाठी अतिशय आव्हानात्मक असलेल्या त्रिपुरा राज्याच्या विद्युत मंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून डॉ. मुरहरी केळे यांनी कार्यकाळ पूर्ण केला आहे.
संत साहित्याचे गाढे अभ्यासक व साहित्यिक असलेले डॉ. मुरहरी केळे यांची मराठी व इंग्रजी भाषेमध्ये पुस्तके प्रकाशित झाली आहेत. अनेक पुस्तकांचे त्यांनी संपादन देखील केले आहे. सोबतच वीज वितरणासह प्रामुख्याने ‘स्मार्ट मीटर’ संबंधी त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले आहेत. नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने ‘पीएचडी’ पदवी प्रदान केली आहे. तसेच अभियांत्रिकीसह व्यवस्थापन, विधी, वाणिन्य, नियामक, लेखा परीक्षण आदी विषयांमध्ये त्यांनी शेक्षणिक पदव्या संपादन केल्या आहेत. विद्यूत क्षेत्रातील कामाचा त्यांना सुमारे ३२ वर्षांचा अनुभव आहे.